
वणी शहरात कायदा कोमात;एल सी बी व एस डी पी ओ यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांचा धुमाकूळ!
रेड आधी, कारवाई नंतर? वणीत LCB चे ‘सेटींग मॉडेल’ उघड!
वणी | प्रतिनिधी
वणी शहराची कायदा-सुव्यवस्थेची धुरा पोलीस अधीक्षकांनी LCB पथकावर सोपवली असली, तरी हेच पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी ‘सेटींग’चे काम करत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहेत. अवैध धंद्यांवर नजर ठेवण्याऐवजी रेडची गोपनीय माहिती आधीच पोहचवली जाते आणि मग सेंटीग झालेल्या ठिकाणांऐवजी इतर ठिकाणी केवळ दिखाऊ कारवाई केली जाते, असा आरोप उघडपणे केला जात आहे.
शहरातील ज्योती बारच्या गल्लीत व लालगुडा चौपाटीवर सर्रास सुरू असलेल्या मटका पट्टीवर कधी ठोस कारवाई झाली आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. काही ठिकाणी PSI स्तरावरील अधिकारी येऊन कारवाई न करता आर्थिक व्यवहार करून परत जात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अवैध धंदे बंद होणार तरी कसे?
धक्कादायक बाब म्हणजे, भाड्याने चालवले जाणारे काही बार राजकीय पाठबळाच्या जोरावर बंदच्या दिवशीही अवैध दारू विक्री करत आहेत. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि शांतता पूर्णतः धोक्यात आली आहे.
या सगळ्या प्रकारात SDPO नेमके काय करत आहेत? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. 26 जानेवारी रोजी आमदार साहेबांनी शहरातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र त्यानंतरही धंदे खुलेआम सुरू आहेत. ही प्रशासनाची असहायता आहे की अवैध धंदेवाल्यांची मुजोरी?
जर लोकप्रतिनिधींच्या सूचनेलाही केराची टोपली दाखवली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडून करावी?
वणी शहरात कायदा चालतोय की अवैध धंदेवाल्यांचा दबदबा? हा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे.
👉 तात्काळ निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अन्यथा वणी शहर अवैध धंद्यांचे केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा जाणकार नागरिक देत आहेत.
