
वणी (प्रतिनिधी) : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तारीख २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडली. या बैठकीत नगर परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा व महाविकास आघाडीच्या स्वरूपात रणनिती आखण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात माजी आमदार वामनराव कासावार यांनी माहिती देताना सांगितले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार संजय देरकर यांच्याशी लवकरच बैठक घेण्यात येणार असून, महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी चर्चा केली जाईल. तसेच या आघाडीत वंचित बहुजन आघाडीला देखील सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली असून, हा प्रस्ताव सध्या विचाराधीन ठेवण्यात आला आहे.
बैठकीस काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खूलसंगे, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, झरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजीव कासावार, इजहार शेख, दिलीप मालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांचे मार्गदर्शनाखाली प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर, तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तसेच संदीप खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सामायिक धोरण, जागावाटप आणि प्रचारयोजना याबाबत प्राथमिक चर्चा केली. उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मजबूत लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला.
“वणी शहरात विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देऊन, सर्वसमावेशक नेतृत्व तयार करणे हा आमचा उद्देश आहे,” — माजी आमदार वामनराव कासावार
महाविकास आघाडीसोबत मनसेही निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.
वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, रॉकापकडे
प्रबळ उमेदवार आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केली आहे.
