
वणी:–
येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वणी शाखेच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये वणी नगरातील 12 वस्त्या मधून एकूण 250 स्वयंससेवक संचलनात सहभागी झाले होते.
दिनांक 27 सप्टेंबरला विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळत असताना भर पावसात पूर्ण गणवेशासह येथील शासकीय मैदानावर एकत्रित होऊन मोठ्या उत्साहात सहभागी झाले. घोषपथकाच्या निनादात शासकीय मैदानावरून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले पथसंचलन टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, नृसिंह व्यायाम शाळा, दीपक चौपाटी, भगतसिंग चौक, टागोर चौक, आंबेडकर चौकापासून पुन्हा शासकीय मैदानावर येऊन पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी पथसंचलनाचे निरीक्षण तालुका संघचालक हरिहर भागवत, शहर संघचालक किरण बुजोने यांनी केले. पथसंचलनाच्या मार्गावर जागोजागी उत्स्फूर्तपणे पुष्प वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यशिक्षक म्हणून नगर सहकार्यवाह कवडू पिंपळकर यांनी जबाबदारी पार पाडली.
