
वणी/झरी-जामनी, दि. ३० जून
झरी-जामनी तालुक्यातील खडकी गणेशपूर येथे असलेल्या डिलाईट केमिकल्स प्रा. लि. कंपनीत घडलेल्या भीषण अपघाताला आठवडा उलटून गेला असतानाही अद्याप चौकशी सुरू झालेली नाही. या घटनेमुळे कामगारांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ही दुर्घटना २५ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. कंपनीचे छत कोसळून गंगा सुखबीर कंवर (वय २०, रा. छत्तीसगड) या महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय ७ कामगार जखमी झाले असून, त्यापैकी विना आत्राम (वय ४५) यांची प्रकृती गंभीर आहे.
शेजारील खाणीतल्या ब्लास्टिंगचा परिणाम?
सदर कंपनीच्या शेजारीच बजरंग सेल्स प्रा. लि. ही हिवरदरा लाइमस्टोन अँड डोलोमाईट माईन कार्यरत आहे. या खाणीत रोज मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केली जाते. कामगार सेलचे म्हणणे आहे की या सततच्या ब्लास्टिंगमुळे डिलाईट केमिकल्स कंपनीचे छत कमकुवत झाले होते. त्यामुळेच हे छत कोसळले आणि अपघात झाला.
अपघातानंतर कंपनी प्रशासनाने ही घटना वादळामुळे घडल्याचा दावा केला. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी या दाव्याला फेटाळले आहे. कारण त्या दिवशी गावात इतर कोणत्याही भागात वादळामुळे नुकसान झाले नव्हते.
*कामगार सेलची तीव्र प्रतिक्रिया – दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी*
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन यांनी मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन देत सदर अपघाताची सखोल चौकशी करून कंपनीच्या दोषी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (IPC 304) दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
“घटनेला आठवडा उलटून गेला, तरीही अजून कोणतीही कारवाई झालेली नाही, हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. मृत कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे आणि जखमी कामगारांना योग्य वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे,” असे आबिद हुसेन यांनी म्हटले आहे.
शासन परवानगीच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह
या प्रकरणामुळे आणखी एक गंभीर बाब पुढे आली आहे ती म्हणजे खाण आणि रासायनिक कंपनी इतक्या जवळ कशा काय सुरू आहेत? कोळशाच्या व खनिज उत्खनन भागात अशा केमिकल कंपनीला परवानगी कशी देण्यात आली? या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
आता प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
या अपघातानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवेदन देतेवेळी प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, अदनान पठाण, सिराज खान, आदी मान्यवर उपस्थित होते.
